दारुच्या नशेत संजय दत्त करणार होता ऋषी कपूरला मारहाण; 'ही' अभिनेत्री होती कारणीभूत

 


कलाविश्वात कधी कोणाची चांगली मैत्री होईल आणि कधी कोणात शत्रूत्व निर्माण होईल याचा काही नेम नाही. त्यामुळे कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींचे कायम किस्से रंगत असतात. यात सध्या अभिनेता संजय दत्त (sanjay dutt)आणि दिवंगत अभिनेता ऋषी कपूर यांच्यातील वादाचा किस्सा रंगला आहे. एकेकाळी एका अभिनेत्रीसाठी संजय दत्त चक्क ऋषी कपूर यांना मारायला निघाला होता.

रॉकी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या संजय दत्तने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली होती. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री टीना मुनीम हिने स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे पहिल्याच चित्रपटामध्ये संजय, टीनाच्या प्रेमात पडला. त्यामुळे त्यांच्या अफेअर्सच्या अनेक चर्चा त्या काळात रंगल्या होत्या. परंतु, या लव्हस्टोरीमध्ये ऋषी कपूर (rishi kapoor) यांची एन्ट्री झाली आणि या दोन्ही अभिनेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली.
त्या दिवसांमध्ये टीना मुनीमने ऋषी कपूरसोबतही अनेक सिनेमे केले होते. त्यामुळे यांच्या जोडीला प्रेक्षकांची अधिक पसंती मिळाली होती. इतकंच नाही तर त्यांच्या अफेअर्सच्याही चर्चा रंगल्या होत्या. एका मासिकातही त्यांच्या नात्याविषयी बरीच उलटसुटल चर्चा झाली होती. ही चर्चा वाचून संजय दत्त प्रचंड संतापला. ऋषी कपूरसोबत टीनाचं नाव जोडलं जाणं संजयला मान्य नव्हतं. त्यामुळे टीनापासून दूर राहा अशी समज देण्यासाठी संजय दत्त ऋषी कपूर यांच्या घरी निघाले. त्यावेळी तो दारुच्या नशेत होता.

संजय दारुच्या नशेत असल्यामुळे अभिनेता गुलशन ग्रोवरदेखील त्याच्यासोबत त्याला सावरायला गेले होते. यावेळी ऋषी कपूरच्या घरी न जाता तो थेट नीतू सिंग (neetu singh) यांच्या पाली हिल परिसरातील घरी गेला आणि घडलेला प्रकार सांगितला. परंतु, यावेळी नीतू कपूर यांनी परिस्थिती नीट हाताळली आणि संजयचा राग शांत केला. दरम्यान, पुढे नीतू सिंग आणि ऋषी कपूर यांचं लग्न झालं आणि सगळं चित्र स्पष्ट झालं. हा प्रसंग ऋषी कपूर यांच्या 'खुल्लम खुल्ला' या आत्मचरित्रपर पुस्तकात लिहिण्यात आला आहे.