ऑस्ट्रेलियात पंतप्रधान नरेंद मोदी म्हणाले, मी पुन्हा आलो…” पण का? जाणून घ्या

 


जी-७ परिषदेत आपली छाप पाडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. सिडनीतल्या कुडोस बँक एरिनामध्ये भारतीय पंतप्रधानांचं जंगी स्वागत करण्यात आलं. येथे जमलेल्या हजारो अनिवासी भारतीय आणि ऑस्ट्रेलियन नागरिकांशी नरेंद्र मोदी संवाद साधत आहेत. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच भारतीय पंतप्रधानांनी उपस्थितांना त्यांच्या जुन्या वचनाची आठवण करून दिली.

नरेंद्र मोदी म्हणाले, मी २०१४ ला ऑस्ट्रेलियाला आलो होतो, तेव्हा मी एक वचन दिलं होतं की तुम्हाला पुन्हा कोणत्याही भारतीय पंतप्रधानाची २८ वर्षे वाट पाहावी लागणार नाही. बघा आता मी पुन्हा तुमच्यासमोर हजर झालोय. यावेळी मी एकटा आलो नाही, तर एक खास व्यक्ती माझ्याबरोबर आहे. माझ्याबरोबर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बनीसही आले आहेत. त्यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून या कार्यक्रमासाठी वेळ काढला, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

दरम्यान. भारतीय पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सिडनी येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ वर्षांनी पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाला गेले आहेत. ऑस्ट्रेलियातले भारतीय वंशाचे लोक त्यांच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येने जमले आहेत.

सिडनीच्या एरिना स्टेडियमवर बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले, क्रिकेटने आपल्याला (भारत आणि ऑस्ट्रेलिया) अनेक वर्षांपासून बांधून ठेवलं आहे. त्याचबरोबर आता टेनिस आणि चित्रपटही आपल्याला जोडून ठेवत आहेत. आपले खाद्यपदार्थ आणि खाण्यापिण्याच्या सवयी वेगळ्या असू शकतात, पण आता आपल्याला मास्टर शेफने जोडलं आहे.

मोदींनी भाषणाला सुरुवात करायच्या आधी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बनीस म्हणाले, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन देश खूप जुने मित्र आहेत. त्यांनी मोदींना बॉस अशी हाक मारली आणि म्हणाले, पंतप्रधान मोदींचं स्वागत करणं ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे.