वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी चढले दुसऱ्यांदा बोहल्यावर, लग्नाचे फोटो व्हायरल

 


बॉलिवूड अभिनेता आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी अनेक चित्रपटात खलनायकी भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले. त्यांच्या चित्रपटाची आणि त्यातील अभिनयाची नेहमीच चर्चा होताना दिसते. त्यांनी हिंदी,मराठी, तेलुगू, तामिळ, कन्नडा,इंग्लिश अशा जवळपास सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या हा अभिनेता त्याच्या खासगी आयुष्याला घेऊन चर्चेत आला आहे. आशिष विद्यार्थी यांनी लग्नगाठ बांधत सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे. विशेष म्हणजे वयाच्या साठीत असणाऱ्या आशिष बोहल्यावर चढले आहेत.

मिळाेल्या माहितीनुसार, आशिष विद्यार्थी यांनी त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. रिपोर्ट्सनुसार, आशिष यांनी आसाममधील प्रसिद्ध फॅशन इंटरप्रिटर असणाऱ्या रुपाली बरुआ यांच्याशी लग्नगाठ बांधली. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आशिष विद्यार्थी यांनी कोलकत्तामधील एका क्लबमध्ये आयोजित एका कार्यक्रमात लग्नगाठ बांधली आहे. आशिष आणि रुपाली यांनी आसामी पद्धतीने विवाह केला आहे. त्यांच्या लग्नाचे काही फोटो समोर आले आहेत.

आशिष विद्यार्थी यांचं हे दुसरं लग्न आहे. यापूर्वी त्यांनी राजोशी यांच्यासोबत लग्न केलं आहे. या लग्नामधून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. अभिनेत्याने अचानक दुसरं लग्न करत सर्वांनाच धक्का दिला आहे.

आशिष विद्यार्थी यांचा जन्म हा केरळमधील असून त्यांच्या आई या प्रसिद्ध कथ्थक नर्तिका होत्या. त्यांनी कॉलेज जीवनात असताना रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. तसेच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले. त्यांनी सरदार या चित्रपटाद्वारे त्यांच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. द्रोहकाल या चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या असून प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद त्यांच्या भूमिकांना मिळालेला आहे.